Main pages

ٱقۡتَرَبَ لِلنَّاسِ حِسَابُهُمۡ وَهُمۡ فِی غَفۡلَةࣲ مُّعۡرِضُونَ ﴿1﴾

१. लोकांच्या हिशोबाची वेळ जवळ येऊन पोहोचली आहे. तरीही ते गफलती (च्या अवस्थे) त तोंड फिरवून आहेत.

مَا یَأۡتِیهِم مِّن ذِكۡرࣲ مِّن رَّبِّهِم مُّحۡدَثٍ إِلَّا ٱسۡتَمَعُوهُ وَهُمۡ یَلۡعَبُونَ ﴿2﴾

२. त्यांच्याजवळ, त्यांच्या पालनकर्त्यातर्फे ज्या देखील नवनवीन शिकवणी येतात, त्यांना ते खेळण्या बागडण्यातच ऐकतात.

لَاهِیَةࣰ قُلُوبُهُمۡۗ وَأَسَرُّوا۟ ٱلنَّجۡوَى ٱلَّذِینَ ظَلَمُوا۟ هَلۡ هَـٰذَاۤ إِلَّا بَشَرࣱ مِّثۡلُكُمۡۖ أَفَتَأۡتُونَ ٱلسِّحۡرَ وَأَنتُمۡ تُبۡصِرُونَ ﴿3﴾

३. त्यांची मने पूर्णतः गाफील आहेत आणि त्या अत्याचारींनी हळू हळू कानगोष्टी केल्यात की तो तुमच्यासारखाच मनुष्य आहे, मग तुम्ही डोळ्यांदेखत जादूला बळी पडण्याचे कारण काय?

قَالَ رَبِّی یَعۡلَمُ ٱلۡقَوۡلَ فِی ٱلسَّمَاۤءِ وَٱلۡأَرۡضِۖ وَهُوَ ٱلسَّمِیعُ ٱلۡعَلِیمُ ﴿4﴾

४. (पैगंबर) म्हणाले, माझा पालनकर्ता आकाशात व धरतीत असलेल्या प्रत्येक गोष्टीस चांगल्या प्रकारे जाणतो. तो खूप खूप ऐकणारा आणि जाणणारा आहे.

بَلۡ قَالُوۤا۟ أَضۡغَـٰثُ أَحۡلَـٰمِۭ بَلِ ٱفۡتَرَىٰهُ بَلۡ هُوَ شَاعِرࣱ فَلۡیَأۡتِنَا بِـَٔایَةࣲ كَمَاۤ أُرۡسِلَ ٱلۡأَوَّلُونَ ﴿5﴾

५. (एवढेच नव्हे तर) हे असेही म्हणतात की हा कुरआन गोंधळपूर्ण स्वप्नांचा संग्रह आहे, किंबहुना त्याने स्वतःच रचून घेतला आहे, किंबहुना तो कवी आहे अन्यथा त्याने आमच्यासमोर एखादी अशी निशाणी आणली असती, जसे पूर्वीच्या काळातील पैगंबर पाठविले गेले होते.

مَاۤ ءَامَنَتۡ قَبۡلَهُم مِّن قَرۡیَةٍ أَهۡلَكۡنَـٰهَاۤۖ أَفَهُمۡ یُؤۡمِنُونَ ﴿6﴾

६. यांच्यापूर्वी जेवढ्या वस्त्या आम्ही नष्ट केल्या, त्या ईमानधारक नव्हत्या, तेव्हा आता काय हे ईमान राखतील?

وَمَاۤ أَرۡسَلۡنَا قَبۡلَكَ إِلَّا رِجَالࣰا نُّوحِیۤ إِلَیۡهِمۡۖ فَسۡـَٔلُوۤا۟ أَهۡلَ ٱلذِّكۡرِ إِن كُنتُمۡ لَا تَعۡلَمُونَ ﴿7﴾

७. तुमच्यापूर्वी जेवढे देखील पैगंबर आम्ही पाठविले, ते सर्व मानव होते, ज्यांच्याकडे आम्ही वहयी (प्रकाशना) अवतरित करीत असू तेव्हा तुम्ही ज्ञानी लोकांना विचारा, जर स्वतः तुम्हाला ज्ञान नसेल.

وَمَا جَعَلۡنَـٰهُمۡ جَسَدࣰا لَّا یَأۡكُلُونَ ٱلطَّعَامَ وَمَا كَانُوا۟ خَـٰلِدِینَ ﴿8﴾

८. आणि आम्ही त्यांना असे शरीर दिले नव्हते की भोजन करीत नसावेत आणि ना ते सदैव जिवंत राहणारे होते.

ثُمَّ صَدَقۡنَـٰهُمُ ٱلۡوَعۡدَ فَأَنجَیۡنَـٰهُمۡ وَمَن نَّشَاۤءُ وَأَهۡلَكۡنَا ٱلۡمُسۡرِفِینَ ﴿9﴾

९. मग आम्ही त्यांच्याशी केलेले सर्व वायदे खरे करून दाखविले, त्यांना आणि ज्यांना ज्यांना आम्ही इच्छिले मुक्ती दिली आणि मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांना नष्ट करून टाकले.

لَقَدۡ أَنزَلۡنَاۤ إِلَیۡكُمۡ كِتَـٰبࣰا فِیهِ ذِكۡرُكُمۡۚ أَفَلَا تَعۡقِلُونَ ﴿10﴾

१०. निःसंशय, आम्ही तुमच्याकडे ग्रंथ अवतरित केला आहे, ज्यात तुमच्यासाठी बोध- उपदेश आहे. मग काय तरीही तुम्ही अकलेचा वापर करीत नाही?

وَكَمۡ قَصَمۡنَا مِن قَرۡیَةࣲ كَانَتۡ ظَالِمَةࣰ وَأَنشَأۡنَا بَعۡدَهَا قَوۡمًا ءَاخَرِینَ ﴿11﴾

११. आणि अनेक अत्याचारी वस्तींना आम्ही नष्ट करून टाकले, मग त्यांच्यानंतर आम्ही दुसरा जनसमूह निर्माण केला.

فَلَمَّاۤ أَحَسُّوا۟ بَأۡسَنَاۤ إِذَا هُم مِّنۡهَا یَرۡكُضُونَ ﴿12﴾

१२. जेव्हा त्या लोकांनी आमच्या शिक्षा- यातनेची जाणीव करून घेतली तेव्हा त्याच्या प्रकोपापासून दूर पळू लागले.

لَا تَرۡكُضُوا۟ وَٱرۡجِعُوۤا۟ إِلَىٰ مَاۤ أُتۡرِفۡتُمۡ فِیهِ وَمَسَـٰكِنِكُمۡ لَعَلَّكُمۡ تُسۡـَٔلُونَ ﴿13﴾

१३. धावपळ करू नका आणि जिथे तुम्हाला सुख प्रदान केले गेले होते, तिथेच परत जा आणि आपल्या घरांकडे जा, यासाठी की तुम्हाला विचारणा केली जावी.

قَالُوا۟ یَـٰوَیۡلَنَاۤ إِنَّا كُنَّا ظَـٰلِمِینَ ﴿14﴾

१४. ते म्हणाले, आमचे वाईट होवो, निःसंशय आम्ही अत्याचारी होतो.

فَمَا زَالَت تِّلۡكَ دَعۡوَىٰهُمۡ حَتَّىٰ جَعَلۡنَـٰهُمۡ حَصِیدًا خَـٰمِدِینَ ﴿15﴾

१५. मग तर ते असेच म्हणत राहिले, येथपर्यंत की आम्ही त्यांना मुळासकट कापलेल्या शेतीसारखे आणि विझलेल्या आगीसारखे करून टाकले.

وَمَا خَلَقۡنَا ٱلسَّمَاۤءَ وَٱلۡأَرۡضَ وَمَا بَیۡنَهُمَا لَـٰعِبِینَ ﴿16﴾

१६. आम्ही आकाश व धरती आणि त्यांच्या दरम्यानच्या वस्तूंना खेळ- तमाशाकरिता बनविले नाही.

لَوۡ أَرَدۡنَاۤ أَن نَّتَّخِذَ لَهۡوࣰا لَّٱتَّخَذۡنَـٰهُ مِن لَّدُنَّاۤ إِن كُنَّا فَـٰعِلِینَ ﴿17﴾

१७. जर आम्ही अशाच प्रकारे खेळ- तमाशा इच्छिला असता तर तो आपल्या जवळूनच बनविला असता, जर आम्ही असे करणारे असतो.

بَلۡ نَقۡذِفُ بِٱلۡحَقِّ عَلَى ٱلۡبَـٰطِلِ فَیَدۡمَغُهُۥ فَإِذَا هُوَ زَاهِقࣱۚ وَلَكُمُ ٱلۡوَیۡلُ مِمَّا تَصِفُونَ ﴿18﴾

१८. किंबहुना आम्ही सत्याला असत्यावर फेकून मारतो तेव्हा सत्य असत्याचा शिरच्छेद करते आणि ते त्याच क्षणी नाश पावते. तुम्ही ज्या गोष्टी रचता, त्या तुमच्यासाठी विनाशकारक आहेत.

وَلَهُۥ مَن فِی ٱلسَّمَـٰوَ ٰ⁠تِ وَٱلۡأَرۡضِۚ وَمَنۡ عِندَهُۥ لَا یَسۡتَكۡبِرُونَ عَنۡ عِبَادَتِهِۦ وَلَا یَسۡتَحۡسِرُونَ ﴿19﴾

१९. आणि आकाशांमध्ये आणि धरतीत जे काही आहे, त्या (अल्लाह) चेच आहे आणि जे त्याच्या निकट आहेत ते त्याच्या उपासनेपासून ना विद्रोह करतात आणि ना थकतात.

یُسَبِّحُونَ ٱلَّیۡلَ وَٱلنَّهَارَ لَا یَفۡتُرُونَ ﴿20﴾

२०. ते दिवस-रात्र त्याच्या पावित्र्याचे वर्णन करतात आणि किंचितही सुस्ती करत नाहीत.

أَمِ ٱتَّخَذُوۤا۟ ءَالِهَةࣰ مِّنَ ٱلۡأَرۡضِ هُمۡ یُنشِرُونَ ﴿21﴾

२१. त्या लोकांनी धरतीच्या (सृष्ट निर्मिती) मधून ज्यांना उपास्य बनवून ठेवले आहे, काय ते जिवंत करतात?

لَوۡ كَانَ فِیهِمَاۤ ءَالِهَةٌ إِلَّا ٱللَّهُ لَفَسَدَتَاۚ فَسُبۡحَـٰنَ ٱللَّهِ رَبِّ ٱلۡعَرۡشِ عَمَّا یَصِفُونَ ﴿22﴾

२२. जर आकाशात आणि धरतीत अल्लाहखेरीज दुसरीही उपास्ये असती तर या दोघांची उलटापालट झाली असती.१ तेव्हा अल्लाह अर्श (ईसिंहासना) चा स्वामी, त्या गुणवैशिट्यांपासून पवित्र आहे ज्या हे मूर्तीपूजक बोलतात.

لَا یُسۡـَٔلُ عَمَّا یَفۡعَلُ وَهُمۡ یُسۡـَٔلُونَ ﴿23﴾

२३. आपल्या कामांकरिता तो (कोणासमोर) उत्तरयायी नाही, मात्र सर्वांना (त्याच्यासमोर) जाब द्यावा लागणार आहे.

أَمِ ٱتَّخَذُوا۟ مِن دُونِهِۦۤ ءَالِهَةࣰۖ قُلۡ هَاتُوا۟ بُرۡهَـٰنَكُمۡۖ هَـٰذَا ذِكۡرُ مَن مَّعِیَ وَذِكۡرُ مَن قَبۡلِیۚ بَلۡ أَكۡثَرُهُمۡ لَا یَعۡلَمُونَ ٱلۡحَقَّۖ فَهُم مُّعۡرِضُونَ ﴿24﴾

२४. काय त्या लोकांनी अल्लाहखेरीज दुसरी उपास्ये बनवून घेतली आहेत, त्यांना सांगा, आणा, आपला पुरावा सादर करा. हा आहे माझ्यासोबत असलेल्यांचा ग्रंथ आणि माझ्यापूर्वीच्या लोकांचा पुरावा! परंतु त्यांच्यापैकी बहुतेक लोक सत्यापासून अनभिज्ञ आहेत, याच कारणास्तव तोंड फिरवून आहेत.

وَمَاۤ أَرۡسَلۡنَا مِن قَبۡلِكَ مِن رَّسُولٍ إِلَّا نُوحِیۤ إِلَیۡهِ أَنَّهُۥ لَاۤ إِلَـٰهَ إِلَّاۤ أَنَا۠ فَٱعۡبُدُونِ ﴿25﴾

२५. आणि आम्ही तुमच्यापूर्वी जो देखील पैगंबर पाठविला, त्याच्याकडे हीच वहयी (ईशवाणी) अवतरित केली की माझ्याखेरीज कोणीही खराखुरा उपास्य नाही, तेव्हा तुम्ही सर्व माझीच उपासना करा.

وَقَالُوا۟ ٱتَّخَذَ ٱلرَّحۡمَـٰنُ وَلَدࣰاۗ سُبۡحَـٰنَهُۥۚ بَلۡ عِبَادࣱ مُّكۡرَمُونَ ﴿26﴾

२६. आणि अनेकेश्वरवादी म्हणतात, रहमान (दयावंत अल्लाह) ला संतती आहे. (मुळीच नाही.) तो पवित्र आहे. किंबहुना ते (ज्यांना हे त्याचे पुत्र समजतात) त्याचे प्रतिष्ठित दास आहेत.

لَا یَسۡبِقُونَهُۥ بِٱلۡقَوۡلِ وَهُم بِأَمۡرِهِۦ یَعۡمَلُونَ ﴿27﴾

२७. त्याच्या (अल्लाहच्या) समोर पुढे होऊन बोलण्याचे साहस करीत नाही आणि त्याच्या आदेशाचे पालन करतात.

یَعۡلَمُ مَا بَیۡنَ أَیۡدِیهِمۡ وَمَا خَلۡفَهُمۡ وَلَا یَشۡفَعُونَ إِلَّا لِمَنِ ٱرۡتَضَىٰ وَهُم مِّنۡ خَشۡیَتِهِۦ مُشۡفِقُونَ ﴿28﴾

२८. तो (अल्लाह) त्यांच्यापूर्वीच्या आणि नंतरच्या सर्व अवस्था जाणून आहे. आणि ते कोणाचीही शिफारस करीत नाही, त्याच्याखेरीज, ज्याच्याशी तो (अल्लहा) प्रसन्न असेल, ते तर स्वतः भयकंपित राहतात.

۞ وَمَن یَقُلۡ مِنۡهُمۡ إِنِّیۤ إِلَـٰهࣱ مِّن دُونِهِۦ فَذَ ٰ⁠لِكَ نَجۡزِیهِ جَهَنَّمَۚ كَذَ ٰ⁠لِكَ نَجۡزِی ٱلظَّـٰلِمِینَ ﴿29﴾

२९. आणि त्यांच्यापैकी कोणी जर सांगेल की अल्लाहखेरीज मी इलाह (पूजनीय) आहे तर आम्ही त्याला जहन्नमची शिक्षा देऊ. जुलमी व अत्याचारींना आम्ही अशाच प्रकारे शिक्षा देतो.

أَوَلَمۡ یَرَ ٱلَّذِینَ كَفَرُوۤا۟ أَنَّ ٱلسَّمَـٰوَ ٰ⁠تِ وَٱلۡأَرۡضَ كَانَتَا رَتۡقࣰا فَفَتَقۡنَـٰهُمَاۖ وَجَعَلۡنَا مِنَ ٱلۡمَاۤءِ كُلَّ شَیۡءٍ حَیٍّۚ أَفَلَا یُؤۡمِنُونَ ﴿30﴾

३०. काय इन्कार करणाऱ्यांनी हे नाही पाहिले की (हे) आकाश व धर्ताी (सर्व) आपसात जुळलेले होते, मग आम्ही त्यांना वेगळे वेगळे केले आणि प्रत्येक सजीवाला आम्ही पाण्यापासून निर्माण केले, मग काय हे लोक तरीही विश्वास करत नाहीत?

وَجَعَلۡنَا فِی ٱلۡأَرۡضِ رَوَ ٰ⁠سِیَ أَن تَمِیدَ بِهِمۡ وَجَعَلۡنَا فِیهَا فِجَاجࣰا سُبُلࣰا لَّعَلَّهُمۡ یَهۡتَدُونَ ﴿31﴾

३१. आणि आम्ही जमिनीवर पर्वत रचले, यासाठी की तिने ईशनिर्मितीला हलवू न शकावे आणि आम्ही तिच्यात त्यांच्या दरम्यान रुंद रस्ते बनविले, यासाठी की लोकांना मार्ग लाभू शकावा.

وَجَعَلۡنَا ٱلسَّمَاۤءَ سَقۡفࣰا مَّحۡفُوظࣰاۖ وَهُمۡ عَنۡ ءَایَـٰتِهَا مُعۡرِضُونَ ﴿32﴾

३२. आणि आकाशाला आम्ही एक सुरक्षित छत बनविले आहे. परंतु हे लोक त्याच्या निशाण्यांवर लक्ष देत नाही.

وَهُوَ ٱلَّذِی خَلَقَ ٱلَّیۡلَ وَٱلنَّهَارَ وَٱلشَّمۡسَ وَٱلۡقَمَرَۖ كُلࣱّ فِی فَلَكࣲ یَسۡبَحُونَ ﴿33﴾

३३. आणि तोच (अल्लाह) आहे, ज्याने रात्र व दिवसाला आणि सूर्य व चंद्राला बनविले. त्यांच्यापैकी प्रत्येक आपापल्या कक्षेत तरंगत आहे.१

وَمَا جَعَلۡنَا لِبَشَرࣲ مِّن قَبۡلِكَ ٱلۡخُلۡدَۖ أَفَإِی۟ن مِّتَّ فَهُمُ ٱلۡخَـٰلِدُونَ ﴿34﴾

३४. आणि तुमच्यापूर्वी आम्ही कोणत्याही माणसाला चिरसजीवता दिली नाही, मग काय, जर तुम्ही मरण पावला तर हे सदैव काळ इथे राहतील? १

كُلُّ نَفۡسࣲ ذَاۤىِٕقَةُ ٱلۡمَوۡتِۗ وَنَبۡلُوكُم بِٱلشَّرِّ وَٱلۡخَیۡرِ فِتۡنَةࣰۖ وَإِلَیۡنَا تُرۡجَعُونَ ﴿35﴾

३५. प्रत्येक जीवाला मृत्युचा स्वाद चाखायचा आहे आणि आम्ही कसोटी घेण्याकरिता तुम्हाला चांगल्या- वाईट अवस्थेत टाकतो आणि तुम्ही सर्वच्या सर्व आमच्याचकडे परतून याल.

وَإِذَا رَءَاكَ ٱلَّذِینَ كَفَرُوۤا۟ إِن یَتَّخِذُونَكَ إِلَّا هُزُوًا أَهَـٰذَا ٱلَّذِی یَذۡكُرُ ءَالِهَتَكُمۡ وَهُم بِذِكۡرِ ٱلرَّحۡمَـٰنِ هُمۡ كَـٰفِرُونَ ﴿36﴾

३६. आणि ज्या लोकांनी कुप्र (अविश्वास) केला, ते जेव्हा तुम्हाला पाहतात तेव्हा तुमची थट्टा उडवितात (सांगतात) की, हाच काय तो, जो तुमच्या दैवतांची चर्चा वाईटरित्या करतो? मात्र ते स्वतःच रहमान (दयावान अल्लाह) चा उल्लेख (महिमागान) करण्यास इन्कार करतात.

خُلِقَ ٱلۡإِنسَـٰنُ مِنۡ عَجَلࣲۚ سَأُو۟رِیكُمۡ ءَایَـٰتِی فَلَا تَسۡتَعۡجِلُونِ ﴿37﴾

३७. मानव जन्मजात उतावळा आहे. मी तुम्हाला आपल्या निशाण्या (चिन्हे) लवकरच दाखविन. तुम्ही माझ्याशी घाई करू नका.

وَیَقُولُونَ مَتَىٰ هَـٰذَا ٱلۡوَعۡدُ إِن كُنتُمۡ صَـٰدِقِینَ ﴿38﴾

३८. आणि म्हणतात की जर खरे असाल तर सांगा की तो वायदा (शिक्षा-यातनेचा) केव्हा पूर्ण होईल?

لَوۡ یَعۡلَمُ ٱلَّذِینَ كَفَرُوا۟ حِینَ لَا یَكُفُّونَ عَن وُجُوهِهِمُ ٱلنَّارَ وَلَا عَن ظُهُورِهِمۡ وَلَا هُمۡ یُنصَرُونَ ﴿39﴾

३९. जर या काफीर लोकांना जाणीव असती की त्या वेळी ना तर हे आगीला आपल्या चेहऱ्यांवरून हटवू शकतील आणि ना आपल्या पाठीवरून आणि ना यांची मदत केली जाईल.

بَلۡ تَأۡتِیهِم بَغۡتَةࣰ فَتَبۡهَتُهُمۡ فَلَا یَسۡتَطِیعُونَ رَدَّهَا وَلَا هُمۡ یُنظَرُونَ ﴿40﴾

४०. होय! वायद्याची वेळ (कयामतचा दिवस) त्यांच्याजवळ अचानक येऊन पोहोचेल आणि त्यांना आश्चर्यचकित करून सोडेल, मग ना तर हे ती वेळ टाळू शकतील आणि ना त्यांना किंचितही सवड दिली जाईल.

وَلَقَدِ ٱسۡتُهۡزِئَ بِرُسُلࣲ مِّن قَبۡلِكَ فَحَاقَ بِٱلَّذِینَ سَخِرُوا۟ مِنۡهُم مَّا كَانُوا۟ بِهِۦ یَسۡتَهۡزِءُونَ ﴿41﴾

४१. आणि तुमच्या पूर्वीच्या पैगंबरांचीही थट्टा उडविली गेली तर ज्यांनी थट्टा उडवली, त्यांना त्याच गोष्टीने येऊन घेरले, जिची ते थट्टा उडवित होते.

قُلۡ مَن یَكۡلَؤُكُم بِٱلَّیۡلِ وَٱلنَّهَارِ مِنَ ٱلرَّحۡمَـٰنِۚ بَلۡ هُمۡ عَن ذِكۡرِ رَبِّهِم مُّعۡرِضُونَ ﴿42﴾

४२. त्यांना विचारा की रहमान (दयाळू अल्लाह) पासून रात्रंदिवस तुमचे रक्षण कोण करू शकतो? किंबहुना हे आपल्या पालनकर्त्याचे स्मरण (महिमागान) करण्यापासून परावृत्त झाले आहेत.

أَمۡ لَهُمۡ ءَالِهَةࣱ تَمۡنَعُهُم مِّن دُونِنَاۚ لَا یَسۡتَطِیعُونَ نَصۡرَ أَنفُسِهِمۡ وَلَا هُم مِّنَّا یُصۡحَبُونَ ﴿43﴾

४३. काय आमच्याखेरीज त्यांचा दुसरा कोणी उपास्य आहे, जो त्यांना संकटापासून वाचवित असेल. कोणीही स्वतः आपली मदत करण्याचे सामर्थ्य बाळगत नाही आणि ना कोणी आमच्या विरोधात साथ देऊ शकतो.

بَلۡ مَتَّعۡنَا هَـٰۤؤُلَاۤءِ وَءَابَاۤءَهُمۡ حَتَّىٰ طَالَ عَلَیۡهِمُ ٱلۡعُمُرُۗ أَفَلَا یَرَوۡنَ أَنَّا نَأۡتِی ٱلۡأَرۡضَ نَنقُصُهَا مِنۡ أَطۡرَافِهَاۤۚ أَفَهُمُ ٱلۡغَـٰلِبُونَ ﴿44﴾

४४. किंबहुना आम्ही यांना आणि यांच्या बुजूर्ग लोकांना जीवनसामुग्री प्रदान केली, येथेपर्यंत की त्यांच्या आयुष्याची हद्द संपली. काय ते नाही पाहात की आम्ही जमिनीला तिच्या किनाऱ्याकडून घटवित चालत आलो आहोत? तर आता काय तेच वर्चस्वशाली आहेत?

قُلۡ إِنَّمَاۤ أُنذِرُكُم بِٱلۡوَحۡیِۚ وَلَا یَسۡمَعُ ٱلصُّمُّ ٱلدُّعَاۤءَ إِذَا مَا یُنذَرُونَ ﴿45﴾

४५. सांगा, मी तर केवळ तुम्हाला अल्लाहच्या वहयी (ईशवाणी) द्वारे सचेत करतो, परंतु बधीर माणसे हाक ऐकत नाहीत, जेव्हा त्यांना सावध केले जात असेल.

وَلَىِٕن مَّسَّتۡهُمۡ نَفۡحَةࣱ مِّنۡ عَذَابِ رَبِّكَ لَیَقُولُنَّ یَـٰوَیۡلَنَاۤ إِنَّا كُنَّا ظَـٰلِمِینَ ﴿46﴾

४६. आणि जर त्यांना तुमच्या पालनकर्त्याच्या शिक्षा- यातनेची नुसती वाफ जरी लागली तर उद्‌गारतील, अरेरे! आमचा विनाश! निःसंशय आम्ही अत्याचारी होतो.

وَنَضَعُ ٱلۡمَوَ ٰ⁠زِینَ ٱلۡقِسۡطَ لِیَوۡمِ ٱلۡقِیَـٰمَةِ فَلَا تُظۡلَمُ نَفۡسࣱ شَیۡـࣰٔاۖ وَإِن كَانَ مِثۡقَالَ حَبَّةࣲ مِّنۡ خَرۡدَلٍ أَتَیۡنَا بِهَاۗ وَكَفَىٰ بِنَا حَـٰسِبِینَ ﴿47﴾

४७. आणि आम्ही कयामतच्या दिवशी त्यांच्या दरम्यान यथायोग्य वजन करणारा तराजू आणून ठेवू, मग कोणावर कशाही प्रकारचा जुलूम केला जाणार नाही आणि जर एक राईच्या दाण्याइतकेही कर्म असेल तर तेही आम्ही समोर आणू, आणि आम्ही हिशोब घेण्यासाठी पुरेसे आहोत.

وَلَقَدۡ ءَاتَیۡنَا مُوسَىٰ وَهَـٰرُونَ ٱلۡفُرۡقَانَ وَضِیَاۤءࣰ وَذِكۡرࣰا لِّلۡمُتَّقِینَ ﴿48﴾

४८. आणि हे पूर्णतः सत्य आहे की आम्ही मूसा आणि हारून यांना निर्णय करणारा दिव्य आणि नेक सदाचारी लोकांकरिता बोध-उपदेशपूर्ण ग्रंथ प्रदान केला आहे.

ٱلَّذِینَ یَخۡشَوۡنَ رَبَّهُم بِٱلۡغَیۡبِ وَهُم مِّنَ ٱلسَّاعَةِ مُشۡفِقُونَ ﴿49﴾

४९. ते लोक, जे न पाहता आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगतात आणि जे कयामत (च्या विचारा) ने भयकंपित राहतात.

وَهَـٰذَا ذِكۡرࣱ مُّبَارَكٌ أَنزَلۡنَـٰهُۚ أَفَأَنتُمۡ لَهُۥ مُنكِرُونَ ﴿50﴾

५०. आणि हा बोध- उपदेश आणि बरकतपूर्ण कुरआन आम्हीच अवतरित केला आहे. मग काय तरीही तुम्ही याचा इन्कार करता़?

۞ وَلَقَدۡ ءَاتَیۡنَاۤ إِبۡرَ ٰ⁠هِیمَ رُشۡدَهُۥ مِن قَبۡلُ وَكُنَّا بِهِۦ عَـٰلِمِینَ ﴿51﴾

५१. आणि निःसंशय, आम्ही याच्यापूर्वी इब्राहीमला सामंजस्य प्रदान केले होते, आणि त्याच्या अवस्थेशी चांगल्या प्रकारे परिचित होतो.

إِذۡ قَالَ لِأَبِیهِ وَقَوۡمِهِۦ مَا هَـٰذِهِ ٱلتَّمَاثِیلُ ٱلَّتِیۤ أَنتُمۡ لَهَا عَـٰكِفُونَ ﴿52﴾

५२. जेव्हा ते आपल्या पित्यास आणि आपल्या जमातीच्या लोकांना म्हणाले की या मूर्त्या, ज्यांचे तुम्ही पुजारी बनून बसला आहात, हे काय आहे?

قَالُوا۟ وَجَدۡنَاۤ ءَابَاۤءَنَا لَهَا عَـٰبِدِینَ ﴿53﴾

५३. ते म्हणाले, आम्हाला आमचे वाडवडील यांचीच उपासना करताना आढळले आहेत.१

قَالَ لَقَدۡ كُنتُمۡ أَنتُمۡ وَءَابَاۤؤُكُمۡ فِی ضَلَـٰلࣲ مُّبِینࣲ ﴿54﴾

५४. इब्राहीम म्हणाले, मग तर तुम्ही आणि तुमचे वाडवडील उघड अशा मार्गभ्रष्टतेत होते.

قَالُوۤا۟ أَجِئۡتَنَا بِٱلۡحَقِّ أَمۡ أَنتَ مِنَ ٱللَّـٰعِبِینَ ﴿55﴾

५५. लोक म्हणाले, काय तुम्ही खरोखर सत्य घेऊन आला आहात की उगाच थट्टा-मस्करी करत आहात?

قَالَ بَل رَّبُّكُمۡ رَبُّ ٱلسَّمَـٰوَ ٰ⁠تِ وَٱلۡأَرۡضِ ٱلَّذِی فَطَرَهُنَّ وَأَنَا۠ عَلَىٰ ذَ ٰ⁠لِكُم مِّنَ ٱلشَّـٰهِدِینَ ﴿56﴾

५६. इब्राहीम म्हणाले, (नव्हे) किंबहुना, खरोखर तुमचा स्वामी व पालनकर्ता आकाशांचा आणि जमिनीचा स्वामी व पालनकर्ता आहे, ज्याने त्यां ना निर्माण केले आहे आणि मी तर याच गोष्टीचा साक्षी (आणि मानणारा) आहे.

وَتَٱللَّهِ لَأَكِیدَنَّ أَصۡنَـٰمَكُم بَعۡدَ أَن تُوَلُّوا۟ مُدۡبِرِینَ ﴿57﴾

५७. आणि अल्लाहची शपथ, मी तुमच्या या उपास्यांचा इलाज जरूर करेन जेव्हा तुम्ही पाठ फिरवून चालते व्हाल.

فَجَعَلَهُمۡ جُذَ ٰ⁠ذًا إِلَّا كَبِیرࣰا لَّهُمۡ لَعَلَّهُمۡ إِلَیۡهِ یَرۡجِعُونَ ﴿58﴾

५८. तेव्हा त्यांनी त्या सर्वांचे तुकडे तुकडे करून टाकले, केवळ मोठ्या मूर्तीला सोडून दिले, तेही अशासाठी की, त्या लोकांनी त्याच्याकडे वळावे.

قَالُوا۟ مَن فَعَلَ هَـٰذَا بِـَٔالِهَتِنَاۤ إِنَّهُۥ لَمِنَ ٱلظَّـٰلِمِینَ ﴿59﴾

५९. ते म्हणाले की आमच्या दैवतांची ही दुर्दशा कोणी केली, असा मनुष्य खात्रीने अत्याचारी असेल.

قَالُوا۟ سَمِعۡنَا فَتࣰى یَذۡكُرُهُمۡ یُقَالُ لَهُۥۤ إِبۡرَ ٰ⁠هِیمُ ﴿60﴾

६०. म्हणाले की आम्ही एका तरुणाला यांच्याविषयी बोलताना ऐकले होते ज्याला इब्राहीम म्हटले जाते.

قَالُوا۟ فَأۡتُوا۟ بِهِۦ عَلَىٰۤ أَعۡیُنِ ٱلنَّاسِ لَعَلَّهُمۡ یَشۡهَدُونَ ﴿61﴾

६१. ते म्हणाले, तर त्याला सर्वांच्या डोळ्यांसमोर घेऊन या, यासाठी की सर्वांनी त्याला पाहून घ्यावे.

قَالُوۤا۟ ءَأَنتَ فَعَلۡتَ هَـٰذَا بِـَٔالِهَتِنَا یَـٰۤإِبۡرَ ٰ⁠هِیمُ ﴿62﴾

६२. म्हणू लागले, हे इब्राहीम! काय तूच आमच्या दैवतांची ही दुर्दशा केली आहेस?

قَالَ بَلۡ فَعَلَهُۥ كَبِیرُهُمۡ هَـٰذَا فَسۡـَٔلُوهُمۡ إِن كَانُوا۟ یَنطِقُونَ ﴿63﴾

६३. इब्राहीम यांनी उत्तर दिले, किंबहुना हे काम तर त्यांच्यातल्या मोठ्या दैवताने केले आहे. तुम्ही आपल्या दैवतांनाच विचारा, जर ते बोलत असतील.

فَرَجَعُوۤا۟ إِلَىٰۤ أَنفُسِهِمۡ فَقَالُوۤا۟ إِنَّكُمۡ أَنتُمُ ٱلظَّـٰلِمُونَ ﴿64﴾

६४. यास्तव त्यांनी आपल्या मनात मान्य केले आणि (मनातल्या मनात) म्हणाले, खरोखर, तुम्ही स्वतः अत्याचारी आहात.

ثُمَّ نُكِسُوا۟ عَلَىٰ رُءُوسِهِمۡ لَقَدۡ عَلِمۡتَ مَا هَـٰۤؤُلَاۤءِ یَنطِقُونَ ﴿65﴾

६५. मग माना खाली घालून (काही विचार करून जरी त्यांनी मान्य केले होते, तरीही म्हणाले) तुम्ही चांगले जाणता की हे बोलत नाहीत.

قَالَ أَفَتَعۡبُدُونَ مِن دُونِ ٱللَّهِ مَا لَا یَنفَعُكُمۡ شَیۡـࣰٔا وَلَا یَضُرُّكُمۡ ﴿66﴾

६६. (इब्राहीम) त्याच क्षणी म्हणाले, अरेरे! काय तुम्ही अशांची उपासना करता, जे तुम्हाला ना काही लाभ पोहचवू शकतात आणि ना हानी!

أُفࣲّ لَّكُمۡ وَلِمَا تَعۡبُدُونَ مِن دُونِ ٱللَّهِۚ أَفَلَا تَعۡقِلُونَ ﴿67﴾

६७. धिःक्कार असो तुमचा आणि त्यांचा, ज्यांची तुम्ही अल्लाहखेरीज उपासना करता, काय तुम्हाला एवढी सुद्धा अक्कल नाही?

قَالُوا۟ حَرِّقُوهُ وَٱنصُرُوۤا۟ ءَالِهَتَكُمۡ إِن كُنتُمۡ فَـٰعِلِینَ ﴿68﴾

६८. ते म्हणाले, जर तुम्हाला काही करायचेच आहे तर याला जाळून टाका आणि आपल्या उपास्यांची मदत करा.

قُلۡنَا یَـٰنَارُ كُونِی بَرۡدࣰا وَسَلَـٰمًا عَلَىٰۤ إِبۡرَ ٰ⁠هِیمَ ﴿69﴾

६९. आम्ही फर्माविले, हे अग्नी! तू इब्राहीमकरिता सलामतीपूर्वक थंड हो.

وَأَرَادُوا۟ بِهِۦ كَیۡدࣰا فَجَعَلۡنَـٰهُمُ ٱلۡأَخۡسَرِینَ ﴿70﴾

७०. त्या लोकांनी इब्राहीमचे वाईट इच्छिले असले तरी आम्ही त्यांनाच असफल केले.

وَنَجَّیۡنَـٰهُ وَلُوطًا إِلَى ٱلۡأَرۡضِ ٱلَّتِی بَـٰرَكۡنَا فِیهَا لِلۡعَـٰلَمِینَ ﴿71﴾

७१. आणि आम्ही (इब्राहीम) आणि लूतला वाचवून त्या भूभागाकडे नेले, ज्यात आम्ही साऱ्या जगाकरिता सुख-समृद्धी ठेवली होती.

وَوَهَبۡنَا لَهُۥۤ إِسۡحَـٰقَ وَیَعۡقُوبَ نَافِلَةࣰۖ وَكُلࣰّا جَعَلۡنَا صَـٰلِحِینَ ﴿72﴾

७२. आणि आम्ही त्यांना इसहाक प्रदान केला आणि त्यावर आणखी याकूब आणि प्रत्येकाला नेक सदाचारी बनविले.

وَجَعَلۡنَـٰهُمۡ أَىِٕمَّةࣰ یَهۡدُونَ بِأَمۡرِنَا وَأَوۡحَیۡنَاۤ إِلَیۡهِمۡ فِعۡلَ ٱلۡخَیۡرَ ٰ⁠تِ وَإِقَامَ ٱلصَّلَوٰةِ وَإِیتَاۤءَ ٱلزَّكَوٰةِۖ وَكَانُوا۟ لَنَا عَـٰبِدِینَ ﴿73﴾

७३. आणि आम्ही त्यांना इमाम (पेशवा) बनविले, यासाठी की आमच्या हुकुमानुसार लोकांना मार्गदर्शन करावे आणि आम्ही त्यांच्याकडे सत्कर्म करण्याची, नमाज कायम करण्याची आणि जकात अदा करण्याची वहयी (प्रकाशना) केली आणि ते सर्वच्या सर्व आमचे उपासक होते.

وَلُوطًا ءَاتَیۡنَـٰهُ حُكۡمࣰا وَعِلۡمࣰا وَنَجَّیۡنَـٰهُ مِنَ ٱلۡقَرۡیَةِ ٱلَّتِی كَانَت تَّعۡمَلُ ٱلۡخَبَـٰۤىِٕثَۚ إِنَّهُمۡ كَانُوا۟ قَوۡمَ سَوۡءࣲ فَـٰسِقِینَ ﴿74﴾

७४. आणि आम्ही लूतलाही हिकमत आणि ज्ञान प्रदान केले आणि त्यांची त्या वस्तीपासून सुटका केली, जिथले लोक घाणेरड्या कामांमध्ये लिप्त होते आणि वस्तुतः ते मोठे वाईट अपराधी लोक होते.

وَأَدۡخَلۡنَـٰهُ فِی رَحۡمَتِنَاۤۖ إِنَّهُۥ مِنَ ٱلصَّـٰلِحِینَ ﴿75﴾

७५. आणि आम्ही त्यांना (लूतला) आपल्या दया-कृपेत सामील करून घेतले. निःसंशय ते नेक- सदाचारी लोकांपैकी होते.

وَنُوحًا إِذۡ نَادَىٰ مِن قَبۡلُ فَٱسۡتَجَبۡنَا لَهُۥ فَنَجَّیۡنَـٰهُ وَأَهۡلَهُۥ مِنَ ٱلۡكَرۡبِ ٱلۡعَظِیمِ ﴿76﴾

७६. आणि नूहचा तो काळ (आठवा) जेव्हा त्यांनी यापूर्वी दुआ (विनंती) केली. आम्ही त्यांची दुआ कबूल केली आणि आम्ही त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला फार मोठ्या दुःखातून सोडविले.

وَنَصَرۡنَـٰهُ مِنَ ٱلۡقَوۡمِ ٱلَّذِینَ كَذَّبُوا۟ بِـَٔایَـٰتِنَاۤۚ إِنَّهُمۡ كَانُوا۟ قَوۡمَ سَوۡءࣲ فَأَغۡرَقۡنَـٰهُمۡ أَجۡمَعِینَ ﴿77﴾

७७. आणि त्या जनसमूहाच्या विरोधात त्यांची मदत केली, ज्याने आमच्या आयतींना खोटे ठरविले होते. वास्तविक ते फार वाईट लोक होते, तेव्हा आम्ही त्या सर्वांना बुडवून टाकले.

وَدَاوُۥدَ وَسُلَیۡمَـٰنَ إِذۡ یَحۡكُمَانِ فِی ٱلۡحَرۡثِ إِذۡ نَفَشَتۡ فِیهِ غَنَمُ ٱلۡقَوۡمِ وَكُنَّا لِحُكۡمِهِمۡ شَـٰهِدِینَ ﴿78﴾

७८. आणि दाऊद आणि सुलेमान यांचेही (स्मरण करा) जेव्हा ते शेताबाबत निर्णय करीत होते की काही लोकांच्या शेळ्या त्या शेतात घुसून चरल्या आणि त्यांच्या निर्णयात आम्ही हजर होतो.

فَفَهَّمۡنَـٰهَا سُلَیۡمَـٰنَۚ وَكُلًّا ءَاتَیۡنَا حُكۡمࣰا وَعِلۡمࣰاۚ وَسَخَّرۡنَا مَعَ دَاوُۥدَ ٱلۡجِبَالَ یُسَبِّحۡنَ وَٱلطَّیۡرَۚ وَكُنَّا فَـٰعِلِینَ ﴿79﴾

७९. तेव्हा आम्ही त्याचा यथार्थ फैसला सुलेमानला समजावून दिला. निःसंशय आम्ही प्रत्येकाला हिकमत आणि ज्ञान प्रदान केले होते आणि पर्वतांना दाऊदच्या अधीन केले होते जे अल्लाहची तस्बीह (महिमागान) करीत असत, आणि पक्ष्यांनाही असेच आम्ही करणारे होतो.

وَعَلَّمۡنَـٰهُ صَنۡعَةَ لَبُوسࣲ لَّكُمۡ لِتُحۡصِنَكُم مِّنۢ بَأۡسِكُمۡۖ فَهَلۡ أَنتُمۡ شَـٰكِرُونَ ﴿80﴾

८०. आणि आम्ही दाऊदला तुमच्यासाठी युद्धाचा पोषाख (चिलखत) बनविणे शिकविले, यासाठी की युद्धा (च्या हानी) पासून तुमचे रक्षण करू शकावे, मग काय तुम्ही आता कृतज्ञशील व्हाल?

وَلِسُلَیۡمَـٰنَ ٱلرِّیحَ عَاصِفَةࣰ تَجۡرِی بِأَمۡرِهِۦۤ إِلَى ٱلۡأَرۡضِ ٱلَّتِی بَـٰرَكۡنَا فِیهَاۚ وَكُنَّا بِكُلِّ شَیۡءٍ عَـٰلِمِینَ ﴿81﴾

८१. आणि आम्ही वेगवान हवेला सुलेमानच्या अधीन केले, जी त्यांच्या आदेशानुसार अशा जमिनीकडे वाहत असे, जिच्यात आम्ही समृद्धी (बरकत) राखली होती, आणि आम्ही प्रत्येक गोष्टीला जाणतो.

وَمِنَ ٱلشَّیَـٰطِینِ مَن یَغُوصُونَ لَهُۥ وَیَعۡمَلُونَ عَمَلࣰا دُونَ ذَ ٰ⁠لِكَۖ وَكُنَّا لَهُمۡ حَـٰفِظِینَ ﴿82﴾

८२. आणि (अशाच प्रकारे) अनेक सैतानांना देखील (त्यांचे ताबेदार बनविले होते) जे सुलेमानच्या हुकुमानुसार (समुद्रात) बुडी घेत असत आणि याशिवाय इतर अनेक कामे करीत असत आणि त्यांचे रक्षणकर्ता आम्हीच होतो.

۞ وَأَیُّوبَ إِذۡ نَادَىٰ رَبَّهُۥۤ أَنِّی مَسَّنِیَ ٱلضُّرُّ وَأَنتَ أَرۡحَمُ ٱلرَّ ٰ⁠حِمِینَ ﴿83﴾

८३. आणि अय्यूब (च्या त्या अवस्थेची आठवण करा) जेव्हा त्यांनी आपल्या पालनकर्त्याला पुकारले की मला हा रोग लागला आहे आणि तू सर्व दया करणाऱ्यांपेक्षा जास्त दया करणारा आहेस.

فَٱسۡتَجَبۡنَا لَهُۥ فَكَشَفۡنَا مَا بِهِۦ مِن ضُرࣲّۖ وَءَاتَیۡنَـٰهُ أَهۡلَهُۥ وَمِثۡلَهُم مَّعَهُمۡ رَحۡمَةࣰ مِّنۡ عِندِنَا وَذِكۡرَىٰ لِلۡعَـٰبِدِینَ ﴿84﴾

८४. तेव्हा आम्ही त्यांची (प्रार्थना) ऐकली आणि जे दुःख त्यांना होते ते दूर केले आणि त्यांना त्यांचे कुटुंब प्रदान केले, किंबहुना, त्यांना आपल्या खास दया कृपेने१ त्यासोबत तसेच आणखीही दिले, यासाठी की उपासना करणाऱ्यांकरिता उपदेशकारक ठरावे.

وَإِسۡمَـٰعِیلَ وَإِدۡرِیسَ وَذَا ٱلۡكِفۡلِۖ كُلࣱّ مِّنَ ٱلصَّـٰبِرِینَ ﴿85﴾

८५. आणि इस्माईल आणि इदरीस आणि जुलकिफ्ल हे सर्व धीर-संयम राखणारे होते.

وَأَدۡخَلۡنَـٰهُمۡ فِی رَحۡمَتِنَاۤۖ إِنَّهُم مِّنَ ٱلصَّـٰلِحِینَ ﴿86﴾

८६. आम्ही त्यांना आपल्या दया-कृपेत दाखल करून घेतले, ते सर्व नेक- सदाचारी लोक होते.

وَذَا ٱلنُّونِ إِذ ذَّهَبَ مُغَـٰضِبࣰا فَظَنَّ أَن لَّن نَّقۡدِرَ عَلَیۡهِ فَنَادَىٰ فِی ٱلظُّلُمَـٰتِ أَن لَّاۤ إِلَـٰهَ إِلَّاۤ أَنتَ سُبۡحَـٰنَكَ إِنِّی كُنتُ مِنَ ٱلظَّـٰلِمِینَ ﴿87﴾

८७. आणि मासळीवाल्या (यूनुस अलै.) ची (आठवण करा) जेव्हा ते नाराज होऊन निघून गेले आणि असे समजत होते की आम्ही त्यांना धरणार नाही. शेवटी त्यांनी त्या अंधारांमधून पुकारले, हे उपासनीय (अल्लाह)! तुझ्याखेरीज कोणीही उपास्य नाही. तू पवित्र आहेस. निश्चितच मी अत्याचारी लोकांपैकी आहे.

فَٱسۡتَجَبۡنَا لَهُۥ وَنَجَّیۡنَـٰهُ مِنَ ٱلۡغَمِّۚ وَكَذَ ٰ⁠لِكَ نُـۨجِی ٱلۡمُؤۡمِنِینَ ﴿88﴾

८८. तेव्हा आम्ही त्यांची पुकार (विनंती) मान्य केली आणि त्यांना दुःखातून मुक्त केले आणि आम्ही अशा प्रकारे ईमान राखणाऱ्यांना वाचवितो.

وَزَكَرِیَّاۤ إِذۡ نَادَىٰ رَبَّهُۥ رَبِّ لَا تَذَرۡنِی فَرۡدࣰا وَأَنتَ خَیۡرُ ٱلۡوَ ٰ⁠رِثِینَ ﴿89﴾

८९. आणि जकरियाचे (स्मरण करा) जेव्हा त्यांनी आपल्या पालनकर्त्याजवळ दुआ (प्रार्थना) केली की हे माझ्या पालनकर्त्या! मला तू एकटा सोडू नको. तू सर्वांत उत्तम वारस आहेस.

فَٱسۡتَجَبۡنَا لَهُۥ وَوَهَبۡنَا لَهُۥ یَحۡیَىٰ وَأَصۡلَحۡنَا لَهُۥ زَوۡجَهُۥۤۚ إِنَّهُمۡ كَانُوا۟ یُسَـٰرِعُونَ فِی ٱلۡخَیۡرَ ٰ⁠تِ وَیَدۡعُونَنَا رَغَبࣰا وَرَهَبࣰاۖ وَكَانُوا۟ لَنَا خَـٰشِعِینَ ﴿90﴾

९०. तेव्हा आम्ही त्यांची दुआ (प्रार्थना) स्वीकारली आणि त्यांना यहया (नावाचा पुत्र) प्रदान केला, आणि त्यांच्या पत्नीला त्यांच्यासाठी यथायोग्य बनविले. हे नेक- सदाचारी लोक सत्कर्मांकडे लवकर धाव घेत, आणि आम्हाला मोठ्या आवडीने भय राखून पुकारत असत, आणि आमच्या समोर मोठ्या नम्रतेने राहात असत.

وَٱلَّتِیۤ أَحۡصَنَتۡ فَرۡجَهَا فَنَفَخۡنَا فِیهَا مِن رُّوحِنَا وَجَعَلۡنَـٰهَا وَٱبۡنَهَاۤ ءَایَةࣰ لِّلۡعَـٰلَمِینَ ﴿91﴾

९१. आणि ती (सत्शील स्त्री) जिने आपल्या शील-अब्रुचे रक्षण केले, आम्ही तिच्यात आपला आत्मा फुंकला आणि स्वतः तिला आणि तिच्या पुत्राला साऱ्या जगाकरिता निशाणी (चिन्ह) बनविले.

إِنَّ هَـٰذِهِۦۤ أُمَّتُكُمۡ أُمَّةࣰ وَ ٰ⁠حِدَةࣰ وَأَنَا۠ رَبُّكُمۡ فَٱعۡبُدُونِ ﴿92﴾

९२. हा तुमचा समूह आहे, जो वास्तविक एकच समूह आहे आणि मी तुम्हा सर्वांचा पालनकर्ता आहे, यास्तव तुम्ही सर्व माझीच उपासना करा.

وَتَقَطَّعُوۤا۟ أَمۡرَهُم بَیۡنَهُمۡۖ كُلٌّ إِلَیۡنَا رَ ٰ⁠جِعُونَ ﴿93﴾

९३. परंतु लोकांनी आपसात आपल्या दीन (धर्मा) मध्ये गट बनवून घेतले (तथापि) सर्वांना आमच्याकडे परतून यायचे आहे.१

فَمَن یَعۡمَلۡ مِنَ ٱلصَّـٰلِحَـٰتِ وَهُوَ مُؤۡمِنࣱ فَلَا كُفۡرَانَ لِسَعۡیِهِۦ وَإِنَّا لَهُۥ كَـٰتِبُونَ ﴿94﴾

९४. मग जो कोणी सत्कर्म करेल आणि तो ईमानधारकही असेल तर त्याच्या प्रयत्नांची काहीच उपेक्षा होणार नाही. आम्ही तर त्याचे लिहिणारे आहोत.

وَحَرَ ٰ⁠مٌ عَلَىٰ قَرۡیَةٍ أَهۡلَكۡنَـٰهَاۤ أَنَّهُمۡ لَا یَرۡجِعُونَ ﴿95﴾

९५. आणि ज्या वस्तीला आम्ही नष्ट करून टाकले, तिच्याकरिता अनिवार्य आहे की तिथले लोक परतून येणार नाहीत.

حَتَّىٰۤ إِذَا فُتِحَتۡ یَأۡجُوجُ وَمَأۡجُوجُ وَهُم مِّن كُلِّ حَدَبࣲ یَنسِلُونَ ﴿96﴾

९६. येथेपर्यंत की याजूज आणि माजूज बंधनमुक्त केले जातील आणि ते प्रत्येक उताराकडून धावत येतील.

وَٱقۡتَرَبَ ٱلۡوَعۡدُ ٱلۡحَقُّ فَإِذَا هِیَ شَـٰخِصَةٌ أَبۡصَـٰرُ ٱلَّذِینَ كَفَرُوا۟ یَـٰوَیۡلَنَا قَدۡ كُنَّا فِی غَفۡلَةࣲ مِّنۡ هَـٰذَا بَلۡ كُنَّا ظَـٰلِمِینَ ﴿97﴾

९७. आणि सच्चा वायदा जवळ येऊन ठेपेल, त्या वेळी काफिर लोकांचे डोळे विस्फारलेलेच राहतील की अरेरे! आम्ही या अवस्थेपासून गाफील होतो, किंबहुना खरे पाहता आम्ही अत्याचारी होतो.

إِنَّكُمۡ وَمَا تَعۡبُدُونَ مِن دُونِ ٱللَّهِ حَصَبُ جَهَنَّمَ أَنتُمۡ لَهَا وَ ٰ⁠رِدُونَ ﴿98﴾

९८. तुम्ही आणि ते, ज्यांची अल्लाहखेरीज तुम्ही उपासना करता, सर्व जहन्नमचे इंधन बनाल, तुम्ही सर्व त्या (जहन्नम) मध्ये जाणार आहात.

لَوۡ كَانَ هَـٰۤؤُلَاۤءِ ءَالِهَةࣰ مَّا وَرَدُوهَاۖ وَكُلࣱّ فِیهَا خَـٰلِدُونَ ﴿99﴾

९९. जर ते (सच्चे) उपास्य असते तर जहन्नममध्ये दाखल झाले नसते, आणि सर्वच्या सर्व त्यातच नेहमी राहणार आहेत.

لَهُمۡ فِیهَا زَفِیرࣱ وَهُمۡ فِیهَا لَا یَسۡمَعُونَ ﴿100﴾

१००. ते त्या ठिकाणी मोठमोठ्याने ओरडत असतील आणि तिथे काहीच ऐकू शकणार नाहीत.

إِنَّ ٱلَّذِینَ سَبَقَتۡ لَهُم مِّنَّا ٱلۡحُسۡنَىٰۤ أُو۟لَـٰۤىِٕكَ عَنۡهَا مُبۡعَدُونَ ﴿101﴾

१०१. परंतु ज्यांच्यासाठी आमच्यातर्फे पहिल्यापासूनच सत्कर्म निश्चित आहे, ते सर्व जहन्नमपासून दूरच ठेवले जातील.

لَا یَسۡمَعُونَ حَسِیسَهَاۖ وَهُمۡ فِی مَا ٱشۡتَهَتۡ أَنفُسُهُمۡ خَـٰلِدُونَ ﴿102﴾

१०२. ते तर, जहन्नमची चाहूलही ऐकू शकणार नाहीत आणि आपल्या मनोवांछित वस्तूंसह सदैव राहणारे असतील.

لَا یَحۡزُنُهُمُ ٱلۡفَزَعُ ٱلۡأَكۡبَرُ وَتَتَلَقَّىٰهُمُ ٱلۡمَلَـٰۤىِٕكَةُ هَـٰذَا یَوۡمُكُمُ ٱلَّذِی كُنتُمۡ تُوعَدُونَ ﴿103﴾

१०३. ती भयंकर दहशतही त्यांना उदास करू शकणार नाही आणि फरिश्ते त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करतील की हाच तुमचा तो दिवस आहे, ज्याचा तुम्हाला वायदा दिला जात राहिला.

یَوۡمَ نَطۡوِی ٱلسَّمَاۤءَ كَطَیِّ ٱلسِّجِلِّ لِلۡكُتُبِۚ كَمَا بَدَأۡنَاۤ أَوَّلَ خَلۡقࣲ نُّعِیدُهُۥۚ وَعۡدًا عَلَیۡنَاۤۚ إِنَّا كُنَّا فَـٰعِلِینَ ﴿104﴾

१०४. ज्या दिवशी आम्ही आकाशाला अशा प्रकारे गुंडाळून टाकू, ज्या प्रकारे रोलचे कागद (पत्रिका) गुंडाळले जातात. ज्या प्रकारे पहिल्या खेपेस आम्ही निर्माण केले होते, त्याच प्रकारे दुसऱ्यांदा निर्माण करू. हा आमचा मजबूत वायदा आहे आणि हे आम्ही निश्चितच करू.

وَلَقَدۡ كَتَبۡنَا فِی ٱلزَّبُورِ مِنۢ بَعۡدِ ٱلذِّكۡرِ أَنَّ ٱلۡأَرۡضَ یَرِثُهَا عِبَادِیَ ٱلصَّـٰلِحُونَ ﴿105﴾

१०५. आणि आम्ही जबूर (ग्रंथा) मध्ये सावधगिरीचा इशारा आणि बोध- उपदेशानंतर हे लिहिले आहे की धरतीचे वारस माझे नेक-सदाचारी दास असतील.

إِنَّ فِی هَـٰذَا لَبَلَـٰغࣰا لِّقَوۡمٍ عَـٰبِدِینَ ﴿106﴾

१०६. उपासना करणाऱ्या दासांकरिता तर यात एक मोठी खबर आहे.

وَمَاۤ أَرۡسَلۡنَـٰكَ إِلَّا رَحۡمَةࣰ لِّلۡعَـٰلَمِینَ ﴿107﴾

१०७. आणि आम्ही तुम्हाला समस्त विश्वाकरिता दया-कृपा बनवून पाठविले आहे.

قُلۡ إِنَّمَا یُوحَىٰۤ إِلَیَّ أَنَّمَاۤ إِلَـٰهُكُمۡ إِلَـٰهࣱ وَ ٰ⁠حِدࣱۖ فَهَلۡ أَنتُم مُّسۡلِمُونَ ﴿108﴾

१०८. सांगा की माझ्याकडे तर वहयी (ईशवाणी) केली जाते की तुम्हा सर्वांचा उपास्य (अल्लाह) एकच आहे. तर काय तुम्हीही त्याचे मानणारे आहात?

فَإِن تَوَلَّوۡا۟ فَقُلۡ ءَاذَنتُكُمۡ عَلَىٰ سَوَاۤءࣲۖ وَإِنۡ أَدۡرِیۤ أَقَرِیبٌ أَم بَعِیدࣱ مَّا تُوعَدُونَ ﴿109﴾

१०९. मग जर तो तोंड फिरविल तर सांगा की मी तुम्हाला समानरित्या सचेत केले आहे. आणि मला नाही माहीत की, ज्या गोष्टीचा वायदा तुमच्याशी केला जात आहे, ती जवळ आहे की लांब आहे.

إِنَّهُۥ یَعۡلَمُ ٱلۡجَهۡرَ مِنَ ٱلۡقَوۡلِ وَیَعۡلَمُ مَا تَكۡتُمُونَ ﴿110﴾

११०. निःसंशय (अल्लाह) तुमच्या उघड गोष्टींनाही जाणतो, तसेच जे काही तुम्ही लपविता ते देखील जाणतो.

وَإِنۡ أَدۡرِی لَعَلَّهُۥ فِتۡنَةࣱ لَّكُمۡ وَمَتَـٰعٌ إِلَىٰ حِینࣲ ﴿111﴾

१११. आणि मला याचेही ज्ञान नाही. संभवतः ही तुमची कसोटी असेल आणि एका निर्धारित अवधीपर्यंतचा लाभ असेल.

قَـٰلَ رَبِّ ٱحۡكُم بِٱلۡحَقِّۗ وَرَبُّنَا ٱلرَّحۡمَـٰنُ ٱلۡمُسۡتَعَانُ عَلَىٰ مَا تَصِفُونَ ﴿112﴾

११२. (पैगंबर) स्वतः म्हणाले, हे पालनकर्त्या! न्यायपूर्वक फैसला कर आणि आमचा पालनकर्ता अंतिशय दया करणारा आहे, ज्याच्याकडून मदत मागितली जाते त्या गोष्टीबद्दल, ज्या तुम्ही सांगत आहात.